जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त

 *जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त*


*१०० रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण हा आनंदाचा सोहळा*

*- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

मुंबई दि. २ : स्वातंत्र्य सेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम असलेले दिवंगत जवाहरलाल दर्डा हे खऱ्या अर्थाने रत्न म्हणजे जवाहर होते. राज्यातील विविध विभागाचे मंत्रीपद भूषविताना त्यांनी आपल्या कामाने राज्याची देशात नवीन ओळख करून दिली. त्यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त १०० रूपयांचे नाणे लोकर्पण करणे हा राज्यासाठी आनंद सोहळा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री, पत्रकार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०० रुपयांच्या नाण्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव सुजाता सौनिक, काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक विजय दर्डा, मुख्य संपादक राजेंद्र दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात प्रशासक, लोकप्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १०० रुपयांचे नाणे लोकार्पित करण्याचा निर्णय घेतला.  स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असताना जवाहरलाल दर्डा यांनी कारावासही भोगला आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे त्यांनी राज्याच्या विविध विभागात मंत्री म्हणून काम करत असताना वेगळा ठसा उमटविला. जवाहरलाल दर्डा हे बहुआयामी व्यक्त‍िमत्व, सत्याग्रहाचे तेजस्वी पर्व, न्यायासाठी सर्वसामान्यांचा आवाज बनलेले पत्रकार होते. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात लावलेले रोपटे आज समूहाच्या माध्यमातून वटवृक्ष झाले आहे.  सर्वसामान्यांच्या हिताच्या शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम लोकमत समूह करेल, अशी आशाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

*सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जवाहर दर्डा हे खणखणीत नाणे*

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जवाहरलाल दर्डा हे खणखणीत नाणे आहे. त्यांची राजकीय क्षेत्रातील भूमिका आणि पत्रकार म्हणून भूमिका वेगळी होती. त्यांनी १७ वर्षे विविध विभागात मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या व्यक्त‍िमत्वाने कामाचा वेगळा ठसा उमटविला. इतिहासात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाईल, असे म्हणून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

*स्वतंत्र विचारांचे स्वातंत्र्य सेनानी*

माजी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जवाहर दर्डा हे स्वतंत्र विचारांचे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्याबरोबर काम केले होते. मराठी पत्रकारितेत विदर्भातील परंपरा आजही कायम असल्याचे सांगून, त्यांनी मंत्री म्हणून काम करताना आणि अधिवेशनातील जवाहरलाल दर्डा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

विजय दर्डा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी १०० रुपयांचे नाणे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. चांगल्या कामाला न्याय मिळावा त्यांची परंपरा सुरू रहावी यासाठी शासन कार्यरत असून, ही परंपरा कायम रहावी असे त्यांनी यावेळी सांगत सर्वांचे आभार मानले.

०००

Post a Comment

Previous Post Next Post
Shree Saty 24 Live
Shree Saty 24 Live